रिसोड तालुक्यातील १२ प्रकल्पांनी गाठला तळ!
By admin | Published: April 6, 2017 02:04 AM2017-04-06T02:04:11+5:302017-04-06T02:04:11+5:30
तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
निनाद देशमुख - रिसोड
तालुक्यातील १२ प्रकल्पांनी तळ गाठला असून, उर्वरित पाच प्रकल्पांत सरासरी केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
रिसोड तालुक्यात एकूण १७ प्रकल्प आहेत. यापैकी नेतन्सा लघुपाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात १०.९६ टक्के जलसाठा आहे. याप्रमाणे कोयाळी संग्राहक तलावात १६.५६ टक्के, मोरगव्हाण प्रकल्पात २.३१ टक्के, वाडी रायताळ प्रकल्पात ३५.६३ टक्के तर कुकसा प्रकल्पात ४७.९८ टक्के जलसाठा आहे. उर्वरित बोरखेडी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, हराळ, जवळा, करडा, कोयाळी, मांडवा, पाचंबा, वाघी, वरूड बॅरेज या प्रकल्पांनी तळ गाठला असून, जलसाठा शून्यावर आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, विविध प्रकारच्या प्रदूषणांमधील वाढ व अन्य काही कारणांमुळे ऋतूमानात बदल होत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली; मात्र प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी, जलप्रकल्पांत पुरेसा जलसाठा नव्हता. आता तर तब्बल १२ प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आहे. केवळ पाच प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे. यामुळे पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढत असल्याचे दिसून येते. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे.
जलपातळी खालावत असल्याने आणि मोजक्याच जलाशयांमध्ये अत्यल्प जलसाठा असल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे.