लसीचे १२ हजार डोस प्राप्त; ३० टक्के कोट्यातून मिळणार दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:20+5:302021-05-07T04:43:20+5:30
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची ...
देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात गतवर्षी जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंताही वाढली. दिवसागणिक वेगाने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले; तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यात आली. १६ जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत एका महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीमही अधूनमधून प्रभावित होत आहे. लसीअभावी कधी अर्धेअधिक केंद्र प्रभावित होतात, तर लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वच केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाते. बुधवारी जिल्ह्याला लसीचे १२ हजार डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिनचे आठ हजार आणि कोविशिल्डच्या ४१०० डोसचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनचे डोस हे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राखीव असून, कोविशिल्डचे डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना दिले जातात. यामध्ये ७० टक्के कोट्यातून पहिला डोस, तर ३० टक्के कोट्यातून दुसरा डोस देण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.
...
सात केंद्रांमध्ये दिली जातेय लस
जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय स्तरावरील केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात येत आहे. कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस हे या वयोगटातील नागरिकांसाठीच राखीव ठेवण्यात आले आहेत. मागणीनुसार लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाला म्हणावा तसा वेग येत नसल्याचे दिसून येते.
....
कोट
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे १२ हजार डोस प्राप्त झाले आहेत. या लसीचा पुरवठा संबंधित केंद्रांमध्ये करण्यात आला असून, लसीकरण मोहीम पूर्ववत झाली आहे. कोव्हॅक्सिन लसीचा डोस हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.