१७ पैकी १३ प्रकल्प कोरडेठण्ण !
By admin | Published: May 7, 2017 07:26 PM2017-05-07T19:26:50+5:302017-05-07T19:26:50+5:30
१७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे.
रिसोड : तालुक्यातील १७ प्रकल्पांपैकी १३ प्रकल्प कोरडे तर २ प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहचला आहे. केवळ दोन प्रकल्पात सरासरी १० टक्के जलसाठा आहे.
यंदा जिल्हाभरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या दाहकतेचा सर्वाधिक फटका रिसोड तालुक्यात दिसून येत आहे. भूगर्भातील पाणी पातळी देखील कमालीची खालावल्याने विहीरी, हातपंप, कूपनलीका आटल्या आहेत. त्यामुळे रिसोड शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. पावसाळ्याला अजून बराच अवधी असल्याने भविष्यात पाणी समस्या उग्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी नाल्यासह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडतात. २०१६ च्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. मात्र, प्रकल्प परिसरात पाऊस समाधानकारक नसल्याने प्रकल्पातील जलसाठयात म्हणावी तशी वाढ झाली नव्हती. आता तर तब्बल १३ प्रकल्प कोरडेठण्ण असून, दोन प्रकल्पातील जलसाठा मृतावस्थेत पोहोचला आहे. जलपातळी खालावल्याने आणि जलाशयांमध्ये जलसाठा नसल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. तालुक्यातील नागरिकांना उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके असह्य करून सोडत आहेत. पाणीटंचाईच्या आगीत नागरिक होरपळत असतानादेखील संबंधित प्रशासन ठोस उपाययोजना करीत नसल्याने जनतेमध्ये संतापाची लाट आहे.