१३१ रस्त्यांचा मार्ग सुकर!
By admin | Published: April 2, 2017 02:37 AM2017-04-02T02:37:55+5:302017-04-02T02:37:55+5:30
नऊ कोटींचा निधी प्राप्त; ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे.
वाशिम, दि. १-ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून, यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून १३१ रस्त्यांची कामे होणार आहेत.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी विविध यंत्रणेद्वारे निधीची तरतूद केली जाते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फेदेखील रस्ते व पुलांची सुविधा निर्माण केली जाते. यासाठी सेस फंड, जिल्हा परिषदेचा निधी, जिल्हा नियोजन विकास समिती व विविध योजनेंतर्गतचा शासन निधी अशी कोट्यवधी रुपयांच्या निधीची जुळवाजुळव केली जाते. रस्ते व पूल निर्मितीनंतर अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण होते. नादुरूस्त रस्त्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील खराब रस्त्यांची दुरुस्ती, कच्च्या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच जिल्हा रस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी नोंदविली होती. निधी मंजुरीला मान्यता मिळाल्यानंतर या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ अपेक्षित होता. सन २0१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेने ५0५४ या शीर्षकाखाली (इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण) एकूण ४२ रस्ते कामासाठी चार कोटी २१ लाख ४४ हजार रुपयांचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते, तसेच ३४५१ या शीर्षकाखाली (ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण) ८९ रस्ते कामासाठी चार कोटी ६३ लाख ९५ हजार रुपयांचे नियोजन जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले होते. मार्च महिन्याच्या पंधरवड्यात या नियोजनला मान्यता मिळाल्याने आणि नऊ कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाल्याने आता १३१ ग्रामीण रस्त्यांची कामे सुकर होणार आहेत. ४२ रस्ते हे इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण या शीर्षकाखाली होणार आहेत तर ८९ रस्ते हे ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण या शीर्षकाखाली होणार आहेत. येत्या काही दिवसात या कामांना सुरुवात होईल, असे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी सांगितले.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे, रस्त्यांची दुरूस्ती, रस्त्यांचे मजबुतीकरण आदींसाठी निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे नियोजन पाठविले होते. या नियोजनाला मंजुरी मिळाल्याने जिल्ह्यात १३१ रस्त्यांचे मजबुतीकरण व अन्य कामे केली जाणार आहेत.
- हर्षदा दिलीप देशमुख
अध्यक्ष, जिल्हा परिषद वाशिम