१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 02:00 PM2019-05-13T14:00:43+5:302019-05-13T14:00:48+5:30

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

134 projects remaining at 7 percent water stock! | १३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९७ धरणे कोरडी पडली असून, सहाही तालुके पाण्याच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये सापडली आहेत. पाण्यासाठी हाहा:कार माजलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यास आधीच उशीर होण्यासोबतच दिरंगाई होत असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहण होत चालली आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला. यामुळे वाढत्या बाष्पीभवनाचा प्रचंड परिणाम होवून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून वाशिम तालुक्यातील एकबूर्जी प्रकल्पात १३; तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पात १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्याची सद्य:स्थिती मात्र फारच चिंताजनक असून वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ३ टक्के पाणी उरले आहे. बोराळा, शेलगाव, फाळेगाव आणि पंचाळा या चार प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर ३१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे.
मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ३.५० टक्के पाणी शिल्लक असून ५ प्रकल्प वगळता इतर १८ प्रकल्पांची पातळी शून्य टक्के आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२५ टक्के पाणी शिल्लक असून १५ प्रकल्पांची पातळी शून्यावर आहे. मंगरूळपीर तालुक्यात १५ प्रकल्प असून २ प्रकल्पांमध्येच ३ टक्के पाणी शिल्लक असून इतर सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक आहे; तर उर्वरित १४ प्रकल्प पूर्णत: कोरडे झाले आहेत. जिल्ह्यातील या पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती मात्र थोडी चांगली असून १६ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्के पाणीसाठा आजमितीस शिल्लक असून इतर ८ प्रकल्पांची पातळी शून्यावर गेलेली आहे. एकूणच पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वच तालुके थोड्याफार फरकाने ‘डेंजर झोन’मध्ये सापडले असून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह अन्य पाणीपुरवठा योजनांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे, या उद्देशाने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यावर कात्री लावण्यात आल्याने शहरांमध्ये १० दिवसानंतरच नळाला पाणी सोडले जात आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत केवळ १६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होवू शकला. त्यातही सातत्य नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

Web Title: 134 projects remaining at 7 percent water stock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.