वाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:50 PM2018-09-24T13:50:05+5:302018-09-24T13:51:27+5:30
वाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. झारखंडची राजधानी रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.
यावेळी जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, डॉ. हेडाऊ उस्पस्थित होते.
आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ लक्ष १६ हजार व शहरी भागातील १९ हजार असे एकूण १ लक्ष ३५ हजार कुटुंबांचा समावेश आहे. या कुटूंबांना प्रतिवर्षी ५ लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवांचा लाभ मोफत मिळणार आहे. यामध्ये १ हजार पेक्षा अधिक विविध औषधोपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन २०११ मधील सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेनुसार ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी ७ वर्गातील कुटुंबांचा तसेच शहरी भागातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर इत्यादी ११ वर्गातील कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.