वाशिम जिल्ह्यातील १.३५ लाखांवर कुटूंबांना मिळणार ‘गोल्डन कार्ड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:53 PM2019-07-21T15:53:05+5:302019-07-21T15:53:13+5:30
जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार पात्र असलेल्या दारिद्रयरेषेखालील जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेत मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळणार असून त्यासाठी ‘गोल्डन कार्ड’ देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयांमधील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी. आपले सरकार सेवा केंद्रातून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ठराविक नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयांमध्ये मात्र कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. त्यात नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करून घेण्यासाठी शिधापत्रिका, प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. एखाद्या कुटुंबास प्रधानमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
- डॉ. अंबादास सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम