जिल्ह्यात सात दिवसात १३,६०० कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:41 AM2021-04-06T04:41:07+5:302021-04-06T04:41:07+5:30
जिल्ह्यात चालूवर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तींची आकडेवारी नियंत्रणात होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून हा ...
जिल्ह्यात चालूवर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्गाने बाधित व्यक्तींची आकडेवारी नियंत्रणात होती; मात्र त्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक झाला आहे. त्यानुषंगाने प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात येत आहे. सद्यस्थितीत प्रत्येक कोरोना बाधिताच्या संपर्कातील १५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन सुविधा असलेल्या ३७१ खाटा उपलब्ध असून सध्या ९४ रुग्ण उपचार घेत आहेत, तसेच व्हेंटिलेटर सुविधा असलेल्या ४४ खाटा उपलब्ध असून ७ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली असून तेथे केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिली.