फळबाग लागवड योजनेंतर्गत मिळणार १.३७ लाख रुपये अनुदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 03:11 PM2018-06-03T15:11:45+5:302018-06-03T15:11:45+5:30
वाशिम : शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
वाशिम : शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तीन वर्षात हेक्टरी १.३७ लाख रुपयादरम्यान मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ८ जून २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन वाशिम तालुका प्रशासन व कृषी विभागाने केले.
पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीने फळबागेची जोड मिळाली तर अधिकाधिक उत्पादन मिळू शकते. शासनाच्यावतीनेदेखील यासाठी अनुदान दिले जाते. आवळा, चिंच, आंबा, लिंबू, सीताफळ, चिकू, पेरू, जांभूळ, अंजीर, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कवठ या फळपिकांसाठी अनुदान दिले जाते. फळबाग लागवड योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भू-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार लहान शेतकरी (एक हेक्टरपेक्षा जास्त पण २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक किंवा कुळ) व अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत (वन निवासी वन अधिकार मान्यता) लाभार्थी अधिनियम २००६ नुसार पात्र व्यक्तीला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. अन्य प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉबकार्डधारक असल्यास ती या योजनेसाठी पात्र आहे. इच्छुक लाभार्थींच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. या योजनेतून तीन वर्षामध्ये पीक निहाय हेक्टरी किमान १ लाख १४ हजार ते १ लाख ३७ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहेत. वाशिम तालुक्यातील पात्र शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव ग्रामपंचायत, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे ८ जून २०१८ पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले.