तीन दिवसांत वसूल झाले १.३९ कोटी रुपये!

By admin | Published: November 14, 2016 02:37 AM2016-11-14T02:37:51+5:302016-11-14T02:37:51+5:30

नगर परिषदांकडून करवसुलीचा सपाटा; वाशिम पालिकेने केला सर्वाधिक कर वसूल.

1.39 crore rupees have been recovered in three days! | तीन दिवसांत वसूल झाले १.३९ कोटी रुपये!

तीन दिवसांत वसूल झाले १.३९ कोटी रुपये!

Next

वाशिम, दि. १२- बंद झालेल्या ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा स्वीकारून जिल्हय़ातील नगर परिषद, नगर पंचायतींनी करवसुलीचा सपाटा लावला आहे. विशेष बाब म्हणजे गत तीन दिवसांत करवसुलीच्या आकड्यांनी उच्चांक गाठला असून १ कोटी ३९ लाख ४९ हजार ८७७ रुपये कर वसूल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा रद्द ठरविल्या; मात्र या नोटा स्वीकारून नगर परिषद, नगर पंचायती कर वसूल करू शकत असल्याची मुभा देण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले असून ११, १२ आणि १३ नोव्हेंबर अशा तीन दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत मोठी रक्कम प्रशासनाकडे जमा केली.
तथापि, जिल्हय़ातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या चार नगर परिषदा आणि मानोरा, मालेगाव या दोन नगर पंचायतीअंतर्गत १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत विक्रमी करवसुली केली.
वाशिम नगर परिषदेने करवसुलीचा ऐतिहासिक टप्पा गाठत गेल्या तीन दिवसांत तब्बल ७३ लाख ६८ हजार ५७१ रुपये कर गोळा केला. त्यात ११ नोव्हेंबरला ४८ लाख ९६ हजार ८६८, १२ नोव्हेंबरला ९ लाख ३४ हजार ९३१; तर १३ नोव्हेंबरला आकारण्यात आलेल्या १५ लाख ३६ हजार ७७२ रुपयांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ रिसोड नगर परिषदेने आतापर्यंत २७ लाख ५७ हजार ७३५ रुपये करवसुलीतून मिळविले आहेत. करवसुलीच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या कारंजा नगर परिषदेने आतापर्यंत जुन्या नोटांच्या माध्यमातून २१ लाख २३ हजार ५७१ रुपये महसूल गोळा केला. त्यात ११ नोव्हेंबरला १३ लाख ३४ हजार, १२ रोजी ४ लाख ९५ हजार ५७१ आणि १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ लाख ९४ हजार रुपये गोळा झाले होते.
मालेगाव नगर पंचायतीनेही उत्कृष्ट कामगिरी बजावत गेल्या तीन दिवसांत तब्बल ११ लाख रुपये करवसुली केली. मंगरूळपीर नगर परिषद आणि मानोरा नगर पंचायतीला मात्र मिळालेल्या संधीचा पुरेसा लाभ घेता आलेला नाही. मंगरूळपीर नगर परिषदेने गेल्या तीन दिवसांत ५ लाखांच्या आसपास कर वसूल केला असून मानोरा नगर पंचायतीला दीड लाखाचाही आकडा पार करता आलेला नाही.

Web Title: 1.39 crore rupees have been recovered in three days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.