१४ तासांच्या वीज भारनियमनाचा ‘डिजिटल’ शाळांनाही फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:27 PM2018-10-28T16:27:33+5:302018-10-28T16:27:54+5:30
ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून २५० आणि शासकीय निधीतून २३४ अशा एकूण ४८४ शाळा ‘डिजिटल’ झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा ५७ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्याचे चांगले परिणाम झाले असून २५० शाळा लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत.
यामाध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, दिवसागणिक वाढत्या वीज भारनियमनामुळे ग्रामीण भागातील शाळांचा विद्यूत पुरवठा तासन्तास खंडित राहत असल्याने डिजिटल वर्गखोल्या निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. त्याचा कुठलाच फायदा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची ओरड पालकांमधून होत आहे. ही बाब लक्षात घेता किमान शाळांना तरी सलग वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.