शहरात १४ हजार घरे, अधिकृत नळधारक ११ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:38 AM2021-02-07T04:38:01+5:302021-02-07T04:38:01+5:30
वाशिम: वाशिम शहराची लाेकसंख्या ८७ हजार ३१४ तर घरांची संख्या १४ हजार आहे. १४ हजार घरांची संख्या असलेल्या ...
वाशिम: वाशिम शहराची लाेकसंख्या ८७ हजार ३१४ तर घरांची संख्या १४ हजार आहे. १४ हजार घरांची संख्या असलेल्या शहरात नळधारक मात्र ११ हजार असल्याची नगरपरिषद कार्यालयात नाेंद आहे.
वाशिम शहरातील पाइपलाइन खूप वर्षे जुनी असल्याने काही वर्षांआधीच ती बदलण्यात आली. जुन्या पाइपलाइनमुळे अनेक नागरिकांना गढूळ व घाण पाण्याचा पुरवठा हाेत हाेता. नागरिकांच्या तक्रारी पाहता, संपूर्ण शहरामध्ये नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्यात आली. नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी नगरपरिषदेत माेठ्या प्रमाणात गर्दी राहायची. शहरात १४ हजार घरमालकांपैकी ११ हजार शहरांतील नागरिकांनी अधिकृत नगरपरिषदेकडून कनेक्शन घेतले आहे. यातील काही नागरिक सार्वजनिक नळाच्या पाण्यावरून आपली तहान भागवित आहेत. शहरात अजूनही अनेक भागांत नळ कनेक्शन न पाेहोचल्याने, मिळेल तेथून पाणी किंवा बाेअरवेलच्या पाण्याने नागरिक आपली तहान भागवित आहेत. नवीन वसाहतींमध्ये बहुतांश नागरिकांच्या घरांमध्ये बाेअरवेल केलेले दिसून येते.
वाशिम नगरपरिषदेच्या वतीने काही भागांत सार्वजनिक नळाचा व्यवस्था करण्यात आली आहे. या सार्वजनिक नळांवर झाेपडपट्टीसह अनेक नागरिक पाणी भरून आपली तहान भागवित आहेत.
गत दाेन दिवसांपासून शहरात थकीत कर असलेल्या नागरिकांना नाेटीस बजावण्यात येत आहेत. वाशिम नगरपरिषदेच्या वतीने पाणी कर वसुलीचे ८७ लाख रुपये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार, आजपर्यंत ५० टक्क्याच्या जवळपास कर वसूल झाला आहे. उर्वरित कर वसुलीसाठी कर विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
.....................
अनधिकृत नळाला ब्रेक
वाशिम शहरात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा पाइपलाइन हाेती. ती नादुरुस्त झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत हाेता. नव्याने पाइपलाइन टाकल्याने अनधिकृत नळाला ब्रेक बसला.
..............
निम्म्या पाण्याची गळती
वाशिम शहरात हाेत असलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनमधून काही भागांत पाण्याची माेठ्या प्रमाणात गळती हाेत असल्याने हजाराे लीटर पाणी व्यर्थ जात आहे. शहरातील हिंगाेली नाका परिसरात माेठ्या प्रमाणात गळती हाेत असल्याचे दिसून येते.
.............
४० लाखांचा पाणीकर थकला
नगरपरिषदेच्या वतीने वसूल करण्यात आलेला ४० लाख रुपयांचा पाणी कर नागरिकांकडे थकीत आहे. या संदर्भात नगरपरिषदेच्या वतीने थकीत कर असलेल्यांना नाेटीस बजावण्यात येत आहेत.
८७ लाख कर वसुलीचे उद्दिष्ट नगरपरिषदेने ठेवले असून, यापैकी ५० टक्क्यांच्या जवळपासच वसुली करण्यात आली आहे.
..............
शहरातील जुनी पाइपलाइन बदलून टाकल्याने शहरातील नागरिकांना नवीन टाकण्यात आलेल्या पाइपलाइनवरून कनेक्शन घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त नळधारक वाशिम शहरात दिसून येतात.
- पंकज साेनुने
कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. वाशिम