सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

By दिनेश पठाडे | Published: April 11, 2023 04:25 PM2023-04-11T16:25:04+5:302023-04-11T16:25:29+5:30

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे.

1404 crores loan will be given to farmers | सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

googlenewsNext

वाशिम :  आगामी खरीप हंगामात  जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ९८८ शेतकऱ्यांना १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्या-त्या बँकांना उद्दिष्ठ ठरवून देण्यात आले असून त्यानुसार कर्जवाटप करण्याच्या सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे. खरीप हंगामातील पेरणीला अजूनही तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पेरणीवेळी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवते, उसणवारी, व्याजाने पैसे घेऊन त्यांना पेरणीचे काम पूर्ण करावे लागते. शेतकऱ्यांना पेरणीवेळी पैशाची निकड भासू नये, यासाठी त्यांना पेरणीपूर्वीच कर्ज मिळावे, यासाठी १ एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात केली जाते. बँकांकडे शेतकऱ्यांनी कर्जप्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना वेळेत कर्ज देणे क्रमप्राप्त असते. मात्र अनेक बँकां कर्जप्रस्ताव निकाली काढण्यास विलंब करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कर्ज मिळणे कठीण बनते. शिवाय कर्जाचे नुतनीकरण करण्यावरच बँकांचा भर असतो. त्यामुळे नवीन कर्जदार संख्या वाढत नसल्याचे आढळून येते. यंदा बँकांनी पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक उद्दिष्ट
जिल्ह्यात मध्यवर्ती बँकेच्या अधिक शाखा असल्याने या बँकेला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला ७७० कोटी १८ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून ज्याचा लाभ ६६ हजार ४३९ शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकाना ३७ हजार २८१ शेतकऱ्यांना ४२६ कोटी २२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. खासगी क्षेत्रातील बँकांना ४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ५० कोटी ४७ लाख तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला १३६३६ शेतकऱ्यांना १५७ कोटी ९७ लाख रुपये कर्जवाटप लक्षांक देण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी जिल्ह्याला यंदा १ हजार ४०४ कोटी ८४ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट मिळाले आहे. जिल्ह्यातील त्या-त्या बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे, या हेतूने बँकांनी कर्ज वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील कर्जासाठी वेळीच प्रस्ताव बँकांकडे द्यावा

- दिग्विजय राठोड, जिल्हा उपनिबंधक, वाशिम

Web Title: 1404 crores loan will be given to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी