दोन दिवसांत १४२ बसफेऱ्या; हाती पडले केवळ सहा लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:20+5:302021-04-14T04:37:20+5:30
वाशिम : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील वीकेंड लॉकडाऊनदरम्यान वाशिम आगाराच्या जवळपास १४२ बसफेऱ्यांनी दोन हजार किमीचा ...
वाशिम : जिल्ह्यात शनिवार आणि रविवार या दोन दिवसातील वीकेंड लॉकडाऊनदरम्यान वाशिम आगाराच्या जवळपास १४२ बसफेऱ्यांनी दोन हजार किमीचा टप्पा गाठला असून, यामधून जवळपास सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. आवठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी अर्थात शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊन लागू केला. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशी वाहतुकीला यामधून वगळण्यात आले होते. वाशिम आगारातील जवळपास १४२ बसफेऱ्या या दोन दिवसात धावल्या असून, यामधून सहा लाखांच्या आसपास उत्पन्न मिळाले. शनिवारी ७० बसफेऱ्या आणि रविवारी ७२ बसफेऱ्या झाल्या. वीकेंड लॉकडाऊन असल्याने प्रवाशीही फारसे बाहेर पडले नाहीत.
००००
निम्मेच कर्मचारी कामावर
१) कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय, निमशासकीय व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
२) त्यानुसार आगारांमध्येही निम्मेच कर्मचारी बोलाविण्यात येतात. बसफेऱ्यांची संख्या पाहून कर्मचाऱ्यांना ड्यूटी देण्यात येते. कोरोनाविषयक दक्षता घेतली जात आहे.
०००
दोन दिवसांत सहा लाखांचे उत्पन्न
वाशिम आगारातील ७० बसफेऱ्या शनिवारी झाल्या. यामधून जवळपास दोन लाख ९० हजारांचे उत्पन्न मिळाले. रविवारी ७२ बसफेऱ्या झाल्या. यामधून तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.
कोरोनामुळे प्रवाशी संख्येवर मर्यादा असल्याने निम्मेच प्रवाशी घ्यावे लागतात. त्यातही वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी व रविवारी प्रवाशी संख्या कमी होती.
त्यामुळे अनेक बसफेऱ्यांचा डिझेल व अन्य खर्चही निघाला नसल्याने या फेऱ्या तोट्यात गेल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी बसफेऱ्या सुरू ठेवाव्या लागतात, असे वाशिम आगाराने स्पष्ट केले.
००
कोट बॉक्स
अल्पप्रतिसाद
वीकेंड लॉकडाऊनमुळे शनिवारी व रविवारी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शनिवारी ७० आणि रविवारी ७२ बसफेऱ्या झाल्या असून, यामधून जवळपास सहा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जातो.
- विनोद इलामे
आगारप्रमुख, वाशिम