अवैध वाहतूक होणारी १.४८ लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:46+5:302021-05-14T04:40:46+5:30
वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जात असलेल्या एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या नेली जाणारी १.४८ लाखांची दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त ...
वाशिम : रिसोडवरून मालेगावकडे जात असलेल्या एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या नेली जाणारी १.४८ लाखांची दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली. यासह १० लाख रुपयांचे वाहनही ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई १२ मे रोजी करण्यात आली.
जिल्ह्यातील रिसोड शहरातून काहीजण देशी, विदेशी दारूची अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी विशेष पथक नेमून रिसोड-मालेगाव रस्त्यावरील बिबखेड फाटा येथे तैनात केले. दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोलेरो वाहन रिसोडवरून येताना दिसले. त्याला थांबवून झाडाझडती घेतली असता, त्यात विदेशी कंपनीची २१ पेटी दारू (किंमत १ लाख ४८ हजार ८०० रुपये) सापडली. याबाबत वाहनचालक राजेश गोविंदराव काळमेघ (रा. अकोला) व त्याचा साथीदार गजानन जैताडे (रा. वाशिम) यांना विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे दारूसह (एमएच ३० बीडी ३९१७) या क्रमांकाचे वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर रिसोड पोलीस ठाण्यात कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.....................
बाॅक्स :
कृष्णा गावात हातभट्टीची दारू जप्त
याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ मे रोजी वाशिम तालुक्यातील कृष्णा या गावात धडक देऊन ७० लीटर गावठी हातभट्टीची दारू व ३०० लीटर सडवा मोहमाच असा एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हातभट्टी दारू गाळणारे विलास फकिरा राठोड व जोतीराम जयराम जाधव या दोघांवर अनसिंग पोलीस ठाण्यात महाराष्ट दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.