१.५ कोटींचा रस्ता निकृष्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:32 AM2017-07-31T01:32:59+5:302017-07-31T01:33:07+5:30
मंगरूळपीर: शहरातील बायपास रोड व मानोरा चौक ते बिरबलनाथ चौक या दीड कोटींच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: शहरातील बायपास रोड व मानोरा चौक ते बिरबलनाथ चौक या दीड कोटींच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याने पालिकेतील नगरसेवकच आक्रमक झाले असून, या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे चौकशी करून संबंधित कंत्राटराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी दहा नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे, की शहरातील मानोरा चौक ते बिरबलनाथ चौकापर्यंत सहा महिन्यांपूर्वी १ कोटी ६६ लाख रुपयांचा रस्ता बांधण्यात आला. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसून, ते १० लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे, तसेच याच कंत्राटदाराने बायपास रस्त्याचे काम केले असून, सदर काम ४० लाख रुपयांचे आहे. मे महिन्यात या रस्त्याचे काम झाले असून, दोन महिन्यांतच या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यात समानता नसून, अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरण्यात आले नाही. कंत्राटदारासोबत पालिकेच्या काही अधिकारी, कर्मचाºयांचे साटेलोटे असल्याने १५ जून रोजी आम्ही तक्रार करूनसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. कंत्राटदाराचे देयक दोन तीन दिवसांत मुख्याधिकारी काढणार असल्याचे समजते. त्यामुळे अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम करावे, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदनावर नगरसेवक तथा गटनेते, प्रा.वीरेंद्रसिंह ठाकूर, पुरुषोत्तम चितलांगे, अनिल गावंडे, उषा हिवरकर, सचिन पवार, ज्योती लवटे, आकाश संगत, मो. अफसर, निदाफिरदोस, जहागीरदार, शे.सलमा मो इरफान यांच्या स्वाक्षरी आहेत. सदर रस्त्यांची उंची जास्त असल्याने नागरिकांना घरातून वाहने काढण्यास त्रास होत आहे, तसेच यामुळे अतिक्रमण वाढले असून, चुकीच्या कामामुळे शासनाचा निधी व्यर्थ ठरला आहे.
आमदारांनीही दिल्या चौकशीच्या सूचना
मंगरूळपीर शहरात विशेष रस्ता अनुदानांतर्गत करण्यात आलेल्या १४ कामांची तक्रार यापूर्वी सात नगरसेवकांसह नागरिकांच्यावतीने मंगरूळपीर-वाशिमचे आमदार लखन मलिक यांच्याकडे केली होती. आमदार लखन मलिक यांनी त्या तक्रारींची दखल घेऊन नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्र पाठवित या कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, या रस्ता कामांची पाहणी करण्यास पालिकेकडून कोणताही कर्मचारी, अधिकारी अद्याप आढळला नाही. त्यामुळे महिनाभरापूर्वी पाठविण्यात आलेल्या आमदारांच्या पत्राची दखल पालिकेने घेतली की नाही किंवा काही चौकशी केली की नाही, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. आता मुख्यमंत्री नगरसेवकांच्या तक्रारींची दखल कधी घेतात आणि काय कार्यवाही करतात, त्याकडे लक्ष लागले आहे.
शहरातील रस्ता कामांची चौकशी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्याबाबत संबंधित अभियंता आणि विभागाच्या इतर कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही कामांची पाहणी करण्यात आली असून, अहवाल तयार झाल्यानंतर वरिष्ठांसह आमदारांकडे त्वरित पाठविण्यात येईल.
- श्रीकृष्ण वाहुरवाघ,
मुख्याधिकारी, नगर परिषद मंगरूळपीर.