१५ कोटींचे अनुदान रखडले
By admin | Published: September 7, 2015 01:41 AM2015-09-07T01:41:46+5:302015-09-07T01:41:46+5:30
सूक्ष्म सिंचन योजनेच्या लाभापासून वाशिम जिल्ह्यातील १0 हजार शेतकरी वंचित.
वाशिम : अवर्षणप्रवण क्षेत्रात २00५ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या वाशिम जिल्हय़ामध्ये विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत २0१४-१५ या वर्षात ऑनलाईन अर्ज केलेल्या दहा हजार शेतकर्यांना ठिबक व तुषार सिंचनासाठी आवश्यक असलेले १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे जिल्हय़ाच्या सिंचन अनुशेषात वाढ होत असून, शेतकर्यांना हे अनुदान त्वरेने उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वास्तविक या योजनेच्या पूर्ततेमध्ये वाशिम जिल्हा एक वर्षाने मागे असून गतवर्षीचेचे हे अनुदान रखडलेले आहे. परिणामी चालू आर्थिक वर्षात अर्ज करणार्या शेतकर्यांच्या अनुदानाचाही प्रश्न निर्माण होत आहे. अवर्षण, अतवृष्टी, गारपीट आणि अनियमित पाऊस यामुळे आधीच अवर्षण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी पिचले आहेत. या शेतकर्यांना विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमांतर्गत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहे; मात्र जिल्हय़ातील अर्ज केलेल्या या शेतकर्यांना हे अनुदान न मिळाल्याने योजनेंतर्गत जमीन सिंचनाखाली आणण्याच्या उद्दिष्टाला परिणामी खो बसत आहे. ठिबक व तुषार संचासाठी जिल्हय़ातील नऊ हजार ७४६ शेतकर्यांनी गतवर्षी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यासाठी शेतकर्यांना १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान कृषी विभागामार्फत मिळणे अपेक्षित होते. २0१५-१६ हे अर्धे आर्थिक वर्ष उलटून गेल्यानंतरही ते शेतकर्यांना मिळालेले नाही. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात केवळ एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान काय ते मिळालेले आहे. मात्र १५ कोटी १२ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही रखडलेले आहे. यामध्ये ठिबक संचासाठी एक हजार ६६४ शेतकर्यांना चार कोटी १६ लाख रुपये आणि तुषार संचासाठी (स्प्रिंकलर) आठ हजार ८२ शेतकर्यांसाठी १२ कोटी १२ लाख ३0 हजार रुपये असे १६ कोटी २८ लाख ३0 हजार रुपयांचे अनुदान हवे आहे. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयातंर्गत त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर शासनाकडे तसी मागणीही केल्या गेली आहे; मात्र एक कोटी १५ लाख ६४ हजार रुपयांचे तुटपुंजे अनुदान वगळता अद्याप शासनाकडून निधीच यासाठी दिला गेला नसल्याचे वास्तव आहे.