वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी!

By admin | Published: May 18, 2017 01:39 AM2017-05-18T01:39:36+5:302017-05-18T01:39:36+5:30

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन : जिल्ह्यातील शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्राचे लोकार्पण

150 crore for power system empowerment! | वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी!

वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी वाशिम जिल्ह्याकरिता १५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याने जिल्ह्यातील वीजविषयक प्रलंबित बहुतांशी प्रश्न मार्गी लागणार आहेत, असे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मालेगाव तालुक्यातील शिरपूर-खंडाळा येथील ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राच्या लोकार्पणप्रसंगी बुधवारी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद सदस्य शबानाबी मो. इमदाद, मालेगाव पंचायत समितीच्या सभापती मंगला गवई, शिरपूरच्या सरपंच सुनीता अंभोरे, राजू पाटील राजे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता विनोद बेथारिया, अनिल डोये, राकेश जनबंधू आदी उपस्थित होते.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, की ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला मजबुती देण्यासाठी राज्य शासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. गेल्या दोन वर्षांत वीज यंत्रणा सक्षम करण्यासोबतच राज्यातील ३ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली आहे. याकरिता आतापर्यंत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यासाठी नवीन तीन लाख अर्ज प्राप्त झाले असून, याकरिता आणखी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांना वीज जोडणीबरोबरच वीज बचत करणारे कृषी पंप ५० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज बचतीबरोबरच शेतकऱ्यांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ मिळावा, याकरिता आणखी १० हजार सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. याबरोबरच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गत एक हजार कृषी पंपांच्या गटाला पीपीपी तत्त्वावर स्वतंत्र्य सौर वाहिनी निर्माण करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत दिवसाची १२ तास वीज उपलब्ध करून देणार असल्याचेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सागितले.
पैनगंगा बॅरेज परिसरातील कृषी पंपांना वीज जोडण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून, याकरिताही लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. सध्याचे युग हे आधुनिकीकरणाचे असून, यामध्ये वीज खात्याची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. त्यासाठी महावितरणने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांच्या सुविधेसाठी मोबाइल अ‍ॅप निर्माण केले. त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही ना. बावनकुळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता भादीकर यांनी केले. संचालन प्रभाकर लहाने यांनी केले. कार्यकारी अभियंता मेश्राम यांनी आभार मानले.

बावनकुळे हे ‘ऊर्जाशील’ मंत्री- खासदार गवळी
जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडण्याचा पंधरा वर्षातील अनुशेष अडीच वर्षात पूर्ण झाला असल्याचे सांगून, वीज यंत्रणेत सुधार झाल्याचे खासदार भावना गवळी यांनी यावेळी सांगितले. याबद्दल त्यांनी ऊर्जा मंत्री ना. बावनकुळे यांची ‘ऊर्जाशील’ मंत्री म्हणून कौतुक केले. आ. पाटणी म्हणाले, ना. बावनकुळे यांच्यामुळे जिल्ह्यातील विजेच्या अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागल्या असून, अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र व रोहित्र उभारणी झाली आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडण्याच्या कामास गती मिळाली असून, आगामी काळातही वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणखी निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आ. झनक यांनी शिरपूर-खंडाळा उपकेंद्राच्या निर्मितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना योग्य दाबाने व अखंडित वीज मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

Web Title: 150 crore for power system empowerment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.