‘त्या’ युवकांची १५०० किमी सायकलवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:19 AM2020-05-17T10:19:15+5:302020-05-17T10:19:23+5:30
बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते.
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबाद येथील रोजगार गेल्याने, मूळचे बिहार राज्यातील पाटणा येथील चार ते पाच युवक सायकलने परत बिहारकडे निघाले. १५ मे रोजी मेहकर ते मालेगाव मार्गावरील कुकसा फाटा येथे या युवकांनी नाश्ता, पाणी केल्यानंतर पुन्हा सायकलने पुढचा मार्ग धरला.
मेहकर ते मालेगाव या मार्गाने दररोज मुंबई, पूणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना येथे विविध कंपन्यातील शेकडो मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी परतत आहेत. रेल्वे, एसटी बसेसची सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे मालवाहू वाहनातुन तसेच काही जण सायकलने आपापल्या गावी परतत आहेत. बिहार राज्यातील पाटणा येथील हितेश नामक युवकासह चार जण औरंगाबाद येथे कामाला गेले होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योगधंदे बंद असल्याने या युवकांचा रोजगारही गेला. गावी परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्यांनी औरंगाबाद येथे सायकल घेउन या सायकलने १५०० किमी अंतर असलेल्या पाटणाकडे आगेकुच चालविली आहे. एवढी आपत्ती कधी पाहिली नाही, असे ते म्हणाले.
आॅटोने गाठले पुसद
पुसद येथील प्रकाश गोपा जाधव यांनी आपबिती कथन केली. बहिणीच्या कुटुंबासोबत मुंबई येथे बिल्डर कंपनीत सेक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये ते पाच वषार्पासून काम करीत होते. त्यांच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहे. त्यांनी मुंबईतच आपली घरे थाटली होती. मात्र कोरोनाने जगभरात घातलेल्या थैमानामुळे देशातही लॉकडाउन करण्यात आले. यामुळे रोजगार गेल्याने आम्ही मालवाहू आॅटोमधून पुसदकडे जात असल्याचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.