नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार
By दिनेश पठाडे | Published: October 29, 2023 01:54 PM2023-10-29T13:54:20+5:302023-10-29T13:55:06+5:30
केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्त्यापोटी जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ५२ शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी ८१ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला.
केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनाने देखील पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय गेल्या अर्थसंकल्पात केला होता. पीएम किसान योजनेचे निकष ग्राह्य धरण्यात आले. महासन्मान निधीच्या पहिल्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत समाविष्ट असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार सिडिंग ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना मिळाला होता. कृषी विभागाने मध्यंतरी विशेष मोहीम राबवून अधिकाधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार सिडिंग करुन घेतले. त्यामुळे जवळपास आठ हजार शेतकऱ्यांची भर पडून त्यांना नमो महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळाला असून पीएम किसान योजनेचा आगामी १५ वा हप्ता मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.