२०७ शेतकऱ्यांच्या खात्यात १.५८ कोटींची रक्कम जमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:17 PM2020-03-01T12:17:51+5:302020-03-01T12:18:03+5:30
पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली.
- सुनील काकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात एप्रिल २०१५ पासून पीक कर्ज थकीत असलेले १ लाख ५ हजार शेतकरी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १.५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकºयांच्या प्राप्त याद्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शनिवार, २९ फेब्रूवारी रोजी दिली.
जिल्ह्यातील कळंबा महाली येथील १७१ आणि सावरगाव बर्डे येथील २६६ अशा ४३७ शेतकºयांची बँक खात्यात प्रथम कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची ‘ट्रायल’ प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यापैकी आधार प्रमाणिकीकरण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या २०७ शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची १.५८ कोटींची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, उर्वरित सर्व पात्र शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील तहसीलदारांकडेही पाठविण्यात आल्या आहेत. संबंधित शेतकºयांना आधार प्रमाणिकीकरण करावे लागणार असून आपले सरकार सेवा केंद्र, बँकांसोबतच त्या-त्या गावांमधील स्वस्त धान्य दुकानांवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.
‘बायोमेट्रीक’वर वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे उमटेना
यापूर्वी प्रायोगिक तत्वावर प्रशासनाने कळंबा महाली आणि सावरगाव बर्डे या दोन गावांतील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या ४३७ शेतकºयांची यादी जाहीर केली; मात्र त्यातील २०७ शेतकºयांच्याच बँक खात्यात रक्कम जमा झाली. अनेक वृद्ध शेतकºयांच्या बोटांचे ठसे ‘बायोमेट्रीक मशीन’वर उमटले नाहीत, असे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिल्याची माहिती मिळाली.
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व शेतकºयांच्या याद्या पोर्टलवर अपलोड झाल्या असून आधार प्रमाणिकीकरण प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली आहे. शेतकºयांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँकेत अथवा स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम