१६ लाख लुटप्रकरण; अडीच लाख रुपये हस्तगत, तीन आरोपी फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:26 PM2021-09-22T17:26:51+5:302021-09-22T17:27:05+5:30
Crime News : प्रकरणातील साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल येऊन फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
शिरपूर जैन : पांगरखेडा येथे जालना जिल्ह्यातील गणेश बोराडे यांचा जवळील सोळा लाख रुपये लुटण्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या विजेंद्र चव्हाण या आरोपीकडून रोख अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी बुधवारी हस्तगत केला. या प्रकरणातील साडेतेरा लाख रुपयांचा मुद्देमाल येऊन फरार असलेल्या तीन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
१५ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील बोद्री येथील गणेश बोराडे यांना पोकलँड मशीन विकत घेण्यासाठी आरोपींनी पांगरखेडा येथे बोलविले. तेथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गाडीत ठेवलेले सोळा लाख रुपये मोबाईल जबरीने लुटला. याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नरेंद्र गयानू चव्हाण विजेंद्र नरेंद्र चव्हाण व एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. नरेंद्र चव्हाण, विजेंद्र चव्हाण या आरोपींना पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान नव्याने जिल्ह्यात दाखल झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश बांगर, पोलीस उपनिरीक्षक शरद साठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक व चमूने आरोपी विजेंद्र याच्याकडून अडीच लाख रुपये रोख व वीस हजार रुपयाचा मोबाईल व एक चाकू जप्त केला.