वाशिम जिल्ह्यात आणखी १६ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या ४२ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 08:18 PM2020-06-12T20:18:36+5:302020-06-12T20:18:43+5:30
१६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निमजगा, वाशिम येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील १०, रिसोड तालुका २ व मालेगाव तालुक्यातील चार अशा एकूण १६ रुग्णांचा कोरोना चाचणीचा अहवाल १२ जून रोजी पॉझिटिव्ह आला. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४२ झाली असून, यापैकी दोघांचा मृत्यू तर सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना यापूर्वीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उर्वरीत ३४ जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात परराज्य, परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरीक परतत असून, सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे असणाºया संदिग्ध रुग्णांना तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. १२ जून रोजी यामध्ये १६ रुग्णांची भर पडली. गुरुवार ११ जून रोजी एकूण ३३ अहवाल प्राप्त झाले होते. त्यात बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. त्याशिवाय दिल्ली येथून सुकळी (ता. कारंजा लाड) येथील तीन आणि कारंजा लाड येथील एका असे पाच जण पॉझिटिव्ह आले होते. १२ जून रोजी सकाळच्या सुमारास दादर (मुंबई) येथून आलेल्या मालेगाव येथील ४६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्याच्यासोबत आलेल्या इतर २ व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' आले. सायंकाळच्या सुमारास एकूण १५ अहवाल पॉझिटिव्ह आले. निमजगा, वाशिम येथील कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १० जणांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मुली आणि १० व ६ वर्षीय मुलांचा समावेश आहे. दिल्ली येथून आलेल्या एकता नगर, रिसोड येथील ४१ वर्षीय व्यक्ती तसेच रिसोड तालुक्यातील कन्हेरी येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिला मुंबई येथून आली आहे.
मुंबई येथून भेरा (ता. मालेगाव) येथे आलेल्या अनुक्रमे २८ व २३ वर्षीय पती-पत्नी तसेच मुंबई येथून खेर्डा (ता. मालेगाव) येथे आलेल्या महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. आता रुग्णसंख्या ४२ वर पोहचली असून, यामध्ये ३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. (प्रतिनिधी)