गोदामांमधील तुरीचे पोते झाले जीर्ण; १६ हजार टन तूर वर्षभरापासून पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:57 PM2018-03-31T14:57:52+5:302018-03-31T14:57:52+5:30
वाशिम : वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ हजार मे.टन तूर पडून आहे. ती हलविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून प्रचंड उदासिनता बाळगली जात असून सद्या भरलेल्या तुरीचे पोते जीर्ण होण्यासोबतच विविध स्वरूपातील किडे आणि उंदीरांचा त्रास बळावल्याचे दिसून येत आहे.
वाशिम : वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये गेल्या वर्षभरापासून तब्बल १६ हजार मे.टन तूर पडून आहे. ती हलविण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडून प्रचंड उदासिनता बाळगली जात असून सद्या भरलेल्या तुरीचे पोते जीर्ण होण्यासोबतच विविध स्वरूपातील किडे आणि उंदीरांचा त्रास बळावल्याचे दिसून येत आहे.
‘नाफेड’मार्फत खरेदी केला जाणारा आणि काही प्रमाणात शेतकºयांचा शेतमाल वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये साठविण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक प्रमाणात तुरीचे असून गेल्या वर्षभरापासून १६ हजार मे.टन तूर गोदामांमध्ये पडून आहे. वास्तविक पाहता ती याठिकाणाहून हलवून गोदामे आतापर्यंत रिकामी होणे आवश्यक होते. मात्र, यासंदर्भात उदासिनता बाळगण्यात आली असून मध्यंतरी दोनवेळा प्रत्येकी ५०० मे.टन आणि दोनवेळा प्रत्येकी १०० मे.टन तूर उचलण्यात आली. उर्वरित तूर आजही गोदामांमध्येच पडून आहे.
दरम्यान, अनेक महिन्यांपासून तूर पोत्यांच्या थप्प्या एकावर एक रचून असल्याने हिवाळ्यात त्यास चक्क फुली आली होती. सद्या मात्र वाढत्या तापमानामुळे हा प्रकार कमी झाला. मात्र, उंदीर आणि विविध स्वरूपातील किड्यांचा गोदामांमध्ये प्रादुर्भाव असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. तुरीचे पोते जीर्ण झाल्याने ते फाटून त्यातून तूर खाली पडत आहे. याशिवाय इतरही समस्या उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये असलेल्या शेतमालाची योग्यरित्या निगा राखली जात आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या थप्प्या लागून असल्याने पोते जीर्ण होवून त्यातून तूर खाली पडत आहे. यामुळे किडे आणि उंदरांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी वेळोवेळी औषध फवारणी केली जाते.
- पी.बी.बांगडे, साठा अधीक्षक, वखार महामंडळ, वाशिम