७ दिवसांत १६ हजारांवर कोरोना चाचण्यांचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:32+5:302021-03-15T04:37:32+5:30
जिल्ह्यात मेडशी येथे एप्रिल २०२० या महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा आलेख सातत्याने वाढत ...
जिल्ह्यात मेडशी येथे एप्रिल २०२० या महिन्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर हा आलेख सातत्याने वाढत गेला. आजमितीस ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण झाले असून कोरोना संसर्गाचे संकट दिवसागणिक अधिक तीव्र होत चालले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून विविध स्वरूपातील उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनाधारकांसह आस्थापनेत कार्यरत कामगारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले. या आदेशाचे पालन करून ११ मार्चपासूनच शहरी व ग्रामीण भागात व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करणे सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सहाही शहरांमध्ये १३ पथक कार्यान्वित करण्यात आले असून चाचणीसाठी २० हजार किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली.
...................
२० हजार कोरोना टेस्ट किट्स उपलब्ध
शहरी भागात नगरपालिका, ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतींना आपापल्या क्षेत्रातील व्यापारी व त्यांच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांनी कोरोना टेस्ट केली किंवा नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने चाचणीसाठी २० हजार ‘किट्स’ उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे १३ पथक याकामी कार्यान्वित करण्यात आले आहेत.
.....................
...अन्यथा गुन्हा दाखल होणार
सर्व खासगी आस्थापनाधारक व त्यात काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी ११ ते २१ मार्च या कालावधीत करणे बंधनकारक आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
.......................
येथे करता येणार कोरोना चाचणी
जिल्हा स्त्री रुग्णालय (वाशिम)
अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह (वाशिम)
उपजिल्हा रुग्णालय (कारंजा)
तुळजा भवानी मंगल कार्यालय (कारंजा)
अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह (तुळजापूर, ता. मंगरूळपीर)
अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह (सवड, ता. रिसोड)
जिल्ह्यातील सर्व २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ६ ग्रामीण रुग्णालये
...............
कोट :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून जिल्ह्यातील व्यापारी व त्यांच्या आस्थापनांमध्ये कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी २० हजार किट्स उपलब्ध असून पथक सक्रिय करण्यात आले आहे. अहवाल वेळेत देण्याचा आरोग्य विभागाचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम