दोन महिन्यात १६ हजार रुग्णांची भर तर १३ हजार रुग्ण ठणठणीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:42 AM2021-04-27T04:42:30+5:302021-04-27T04:42:30+5:30
वाशिम : जिल्ह्यात गत दोन महिन्यात नव्याने १६ हजार कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३ हजार जण बरे होऊन घरी ...
वाशिम : जिल्ह्यात गत दोन महिन्यात नव्याने १६ हजार कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३ हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा सर्वाधिक भरणा असून, सद्यस्थितीत ३२१ रुग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात वाढलेला कोरोनाबाधितांचा आकडा ऑक्टोबरनंतर हळूहळू कमी होत जात डिसेंबर महिन्यात दैनंदिन सरासरी १० पर्यंत खाली आला. जानेवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत फेब्रुवारीच्या मध्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. जिल्ह्यात १ जानेवारी २०२० रोजी कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ६ हजार ६७२ होता. १ फेब्रुवारी रोजी तो ४८२ ने वाढून ७ हजार १५४ झाला; मात्र १ मार्च रोजी हा आकडा तब्बल १ हजार ९१६ ने वाढून ९ हजार ७० झाला. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली; मात्र त्यासोबतच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली. मार्च महिन्यात नव्याने ७१४१ रुग्णांची भर पडली तर ५९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. १ ते २५ एप्रिल या दरम्यान नव्याने ९२३३ रुग्णांची भर पडली तर ७६८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. अहवाल पॉझिटिव्ह आला; परंतु लक्षणे सौम्य असलेल्या रुग्णांना शक्यतोवर गृहविलगीकरण, कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. एकूण कोरोनाबाधितांपैकी गंभीर रुग्णांचा आकडा हा अत्यल्प असल्याने किंचितसे दिलासादायक चित्र आहे.
०००००
बॉक्स
असे आहेत आढळलेले रुग्ण व बरे झालेले रुग्ण
प्रकार मार्च एप्रिल
एकूण नवे रुग्ण ७१४१ ९२३३
एकूण बरे झालेले रुग्ण ५९१४ ७६८९
सरासरी आढळलेले रुग्ण २३० ३६९
सरासरी बरे झालेले रुग्ण १९० ३०७
०००००००००००००००
बॉक्स
३१० रुग्ण ऑक्सिजनवर
कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या त्या तुलनेत अत्यल्प आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सरकारी कोविड हॉस्पिटलसह खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ३१० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत तर २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर आहे.
०००००
कोट बॉक्स
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली तर कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करणे शक्य आहे. मास्कचा वापर करावा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम