१७ वर्षांमध्ये २0 कृषी विकास अधिकारी!
By admin | Published: June 29, 2015 01:36 AM2015-06-29T01:36:16+5:302015-06-29T01:36:16+5:30
वाशिम जिल्हा परिषदेत रूजू होण्यास अधिकारी निरुत्साही.
शिखरचंद बागरेचा / वाशिम : १ जुलै १९९८ ते ४ जून २0१५ या १७ वर्षांत वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल १९ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. आता कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी. कुळकर्णी यांची वर्णी लागली आहे. ते २0 दिवसानंतरही रुजू झाले नसल्यामुळे तूर्तास जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे कृषी विकास अधिकार्याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषीविषयक योजना पात्र शेतकर्यांपर्यंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, खतांचे नियोजन, आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्यांना मार्गदर्शन यांसह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारी यांची नेमणूक शासनातर्फे केली जाते. अकोला जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिमची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली. तेव्हापासून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा वाशिममध्ये स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. प्रथम कृषी विकास अधिकारी म्हणून डी. के. पांडे यांनी सेवा दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेला नियमित व पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी कमी लाभले. १७ वर्षांमध्ये तब्बल २0 कृषी विकास अधिकारी वाशिमला लाभले आहेत. यामध्ये डी.के. पांडे, एम.ए. शेख (तीन वेळा), प्रकाश लोखंडे (पाच वेळा), अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, डी.डी. इंगळे, एन.व्ही. देशमुख (दोन वेळा), पी.के. खंडारे, अनिल बोंडे, पी.एस. शेळके, चंद्रकांत सूर्यवंशी यांचा समावेश आहे. १८ वे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची कोल्हापूर येथे समकक्ष पदावर बदली झाल्याने १९ वे कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी. कुळकर्णी यांची वाशिम येथे समकक्ष पदावर वर्णी लागली आहे; मात्र कुलकर्णी २0 दिवसानंतरही रुजू झाले नसल्यामुळे तूर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विकास अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे देवगिरकर १९ वे अधिकारी ठरले आहेत. कुलकर्णी रुजू झाल्यानंतर कृषी विभागाला २0 वे अधिकारी मिळणार आहेत. तब्बल १३ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकार्यांनी सेवा दिली, तर सहा कृषी विकास अधिकारी नियमित लाभले. यामध्ये डी.के. पांडे, अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, एन.व्ही. देशमुख (दोन वेळा) आणि चंद्रकांत सूर्यवंशी अशा सहा नियमित अधिकार्यांचा समावेश आहे. वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यात अधिकारी रुजू होण्यास फारसे उत्सुक नसतात, हे १७ वर्षांत २0 अधिकार्यांच्या कार्यकाळाने दाखवून दिले आहे.