कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार डोस मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:19+5:302021-04-19T04:38:19+5:30

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसगार्पासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात ...

17,000 doses of corona vaccine were received | कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार डोस मिळाले

कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार डोस मिळाले

Next

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसगार्पासून सुरक्षित करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान एप्रिल महिन्यात लसीचा तुटवडा जाणवत असून गत तीन दिवसांत लसीचा साठाही संपण्याच्या मार्गावर होता. रविवार, १८ एप्रिल रोजी लसीचे १७ हजार डोस प्राप्त झाल्याने सोमवार, १९ एप्रिलपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. मध्यंतरी कोरोनाचा आलेख खाली आला होता. आता पुन्हा कोरोनाचा आलेख वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात कोरोना संसर्गाचा अक्षरश: ‘स्फोट’ झाला. एप्रिल महिन्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक झपाट्याने वाढत चाललेल्या या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले तर दुसरीकडे १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेसही सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. गत १५ दिवसांमध्ये लसीचा साठा मिळण्यातही चढ- उतार दिसून येत आहेत. गत दोन दिवसांपासून लसीअभावी काही केंद्रांमधील लसीकरण मोहीम प्रभावित झाली होती. रविवार १८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १३० पैकी तीन केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू होती. रविवारी जिल्ह्याला लसीचे १७ हजार डोस मिळाले आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन लसीचे १४८०० आणि कोविशिल्ड लसीच्या २२०० डोसचा समावेश आहे.

०००

बॉक्स...

दुसरा डोसही मिळणार

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो; मध्यंतरी लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांना दुसरा डोस मिळाला नव्हता. आता लसीचे १७ हजार डोस प्राप्त झाले असून, १९ एप्रिलपासून लसीकरण मोहीम पूर्ववत होणार असल्याने दुसरा डोसही मिळणार आहे.

--------

कोट बॉक्स...

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे १७ हजार डोस मिळाले आहेत. १९ एप्रिलपासून १३० केंद्रामध्ये लसीकरण मोहीम पूर्ववत होणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

-डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

००

असे मिळाले लसीचे डोस

कोव्हॅक्सिन १४८००

कोविशिल्ड २२००

Web Title: 17,000 doses of corona vaccine were received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.