वाशिम जिल्ह्यात अडकलेले १७२७ नागरिक परतले स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:55 AM2020-05-30T10:55:26+5:302020-05-30T10:55:33+5:30
केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील ५१७१ कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केली, तर कामगार विभागाचेही सहकार्य लाभले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील, तसेच परजिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. प्रशासनाकडून अशा ५१७१ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर यातील ३४२ नागरिकांना शासन आणि प्रशासनाकडून ३१ ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना केंद्र आणि राज्यशासनाकडून देण्यात आल्या आणि त्यासाठी गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना पासेस उपलब्ध करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाप्रशासनाने गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घेतली. त्यानंतर शासकीय कॅम्पमधील ३४२ नागरिक मिळून इतर ठिकाणी असलेल्या १७२७ नागरिकांना परत त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.
तीन हजारांवर कामगार कंत्राटदारांच्या आश्रयात
वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी विविध राज्यातील हजारो कामगार आले आहेत. कोरोना विषाणूवर संसर्गासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही त्यातील हजारो कामगार आपापल्या राज्यात स्वगृही परतले असून, त्यात प्रशासनाच्या परवानगीने परतलेल्या १७२७ कामगारांचा समावेश असला तरी अद्यापही परराज्यातील ३४४४ कामगार जिल्ह्यात कायम असून, हे सर्व कामगार कंत्राटदार कंपनीच्या तळावर आश्रयास आहेत.