१.७५ लाख रुपये दिवसाढवळ्य़ा लंपास
By admin | Published: June 14, 2014 08:39 PM2014-06-14T20:39:09+5:302014-06-14T23:41:39+5:30
युनियन बँकेजवळून अज्ञात चोरट्याने १.८८ लाख रुपयांची पिशवी लंपास केल्याची घटना दुपारच्यावेळी घडली.
वाशिम : स्थानिक बालाजी कॉम्प्लेक्स स्थित युनियन बँकेजवळून अज्ञात चोरट्याने १.८८ लाख रुपयांची पिशवी लंपास केल्याची घटना १३ जून रोजी दुपारच्यावेळी घडली. बालाजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या युनियन बँकेतून हिंगोली रस्त्यावरील सोयाबीन फॅक्टरीतील कर्मचारी मोहन पुरुषोत्तम दुबे १३ जून रोजी दुपारच्यावेळी बँकेत गेले व १ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम खात्यातून काढली. सदर रक्कम पिशवीत टाकून ते ऑटोजवळ आले. ऑटोजवळ चालक नसल्याने त्याला भ्रमणध्वनी करीत असताना पैसे असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळविली. याप्रकरणी मोहन दुबे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही मागील महिन्यात जनता बँकेजवळ ४ लाख ३५ हजार रुपयांची तर पाटणी चौकात तीन लाख रुपयांची पैशाची पिशवी मोटार सायकलवरील आरोपींनी पळवून नेले होते; तसेच शिवाजी चौकात एका सेवानवृत्त पोलिस उपनिरीक्षकांच्या अंगावर खाजकुयरी टाकून १२ हजारांची रक्कम लंपास केली होती. शहरात बँकांमधून मोठय़ा रकमा काढणार्यांजवळील पैसे लंपास करणारी गुन्हेगारी टोळी सक्रिय असूनही पोलिस यंत्रणा निष्क्रीय ठरली आहे.