वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम
By दादाराव गायकवाड | Published: September 24, 2022 03:51 PM2022-09-24T15:51:34+5:302022-09-24T15:52:51+5:30
जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
वाशिम : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पाऊस आणि अतिवृष्टीने लाखो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत संततधार पाऊस झाला. या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने अनेक भागातील जमिनी खरडून गेल्या आहेत. जुलै महिन्यात बरसलेल्या पावसामुळे १२९७.७२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान होऊन ५८५६ शेतकऱ्यांना फटका बसला. ऑगस्ट महिन्यात १.४२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जून ते ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनस्तरावर पाठविण्यात आला. या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात जून ते जुलै महिन्यातील नुकसानापोटी १.७६ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला मिळाला. हा निधी २२ सप्टेंबर रोजीच तहसीलस्तरावर वर्ग करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधीची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीनच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७६ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे वितरण सुरू आहे.
मालेगाव तालुक्यात नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक -
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक १२८६.६० हेक्टरवर पिकांचे नुकसान मालेगाव तालुक्यात झाले. त्याखालोखाल कारंजा तालुक्यात, तर मानोरा तालुक्यात अत्यल्प नुकसान झाले. उर्वरित मंगरुळपीर, वाशिम व रिसोड तालुक्यात ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान ‘निरंक’ असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार नाही.
कोणत्या तालुक्यासाठी किती निधी -
मालेगाव - १,७४,८३,८००
कारंजा - १,१२,८००
मानोरा - ५४,४००