अत्याचाराला १८३ महिला ‘बळी’

By admin | Published: July 6, 2015 02:15 AM2015-07-06T02:15:11+5:302015-07-06T02:19:58+5:30

२0१४ च्या तुलनेत २0१५ मध्ये अन्यायाचा आलेख उंचावला.

183 women 'victim' for abuse | अत्याचाराला १८३ महिला ‘बळी’

अत्याचाराला १८३ महिला ‘बळी’

Next

धनंजय कपाले /वाशिम : विविध प्रकारचे कायदे, समाजधुरीणांचे प्रयत्न, पोलीस यंत्रणेचा दराराही महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात कमी पडत असल्याचे अत्याचारीत घटनांच्या नोंदीहून दिसून येते. एकीकडे महिला सक्षमीकरणावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे महिलांवर दिवसाढवळ्या अन्याय -अत्याचार होत आहेत. वाशिम जिल्हय़ात २0१४ च्या तुलनेत २0१५ या वर्षाच्या सहामाहीत विनयभंग, बलात्कार, छळ, पळवून नेणे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तब्बल १८३ घटनांची नोंद आहे. गतवर्षी सहामाहीत हा आकडा १४३ असा होता. चार भिंतीच्या आड असणारे विश्‍व महिलांना हळूहळू खुले होत गेले. दुय्यम असणारा दर्जा आता अव्वलपर्यंंंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नोकरी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५0 टक्के आरक्षण, कायद्याचे संरक्षण, कोणत्याही क्षेत्रात प्राधान्य आदी सर्वकाही महिलांसाठी केले जात आहे. एकीकडे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला यशाचे शिखर गाठत आहेत तर दुसरीकडे अन्याय-अत्याचाराचे घावही त्या सोसत आहेत. विनयभंग, बलात्कार, अपहरण या घटना तर युवती व महिलांचा जीवन जगण्याचा जणू हक्कच हिरावून घेत आहेत. येथे कायदा व पोलीस संरक्षणही कुचकामी ठरत असल्याचे, आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुलामगिरीच्या विश्‍वातून स्वातंत्र्यात पदार्पण केल्यानंतर महिलांना खर्‍या अर्थाने व्यासपीठ मिळू लागले. कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीचे सोने करीत महिलादेखील विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत; मात्र त्यांच्या पंखातील बळ काढून घेण्याचेही प्रयत्न असामाजिक तत्त्वांकडून होत असल्याचे अन्याय-अत्याचाराच्या घटनांवरून स्पष्ट होते. आजही वाशिम शहराबरोबरच जिल्हय़ातील अनेक युवतींना रोडरोमियोंच्या टिंगलटवाळीला बळी पडावे लागत आहे. टारगट मुलांच्या टोळक्यांमुळे मानसिक यातना सहन करीत युवतींना वाटचाल करावी लागत आहे. जिल्हय़ात जानेवारी ते मे २0१५ या कालावधीत विनयभंगाच्या तब्बल ८३ घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच कालावधीत ५९ युवती व महिलांना विनयभंगाच्या घटनांना बळी पडावे लागले होते. सासरच्या मंडळीकडून छळ होण्याच्या घटनेत किंचितशी वाढ झाली आहे. यावर्षी ५६ घटनांची नोंद असून, गतवर्षी हा आकडा ५४ असा होता. महिलांना पळवून नेण्याच्या घटनेत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. गतवर्षी १२ घटनांची नोंद होती. यावर्षी जानेवारी ते मे या कालावधीत पळवून नेण्याच्या तब्बल २१ घटना घडल्या आहेत. सासरच्या छळाला कंटाळून यावर्षी सहा विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची नोंद पोलीस विभागाच्या दप्तरी आहे.

Web Title: 183 women 'victim' for abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.