जुन्या नोटांवर झाली १.९७ कोटी रुपयांची करवसूली!
By admin | Published: November 12, 2016 09:48 PM2016-11-12T21:48:57+5:302016-11-12T21:48:57+5:30
बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकारून नगर पालिकेचा कर आणि विद्यूत देयक भरून घेण्यास मुभा देण्यात आली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - बंद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकारून नगर पालिकेचा कर आणि विद्यूत देयक भरून घेण्यास मुभा देण्यात आली आहे. यानुषंगाने गत दोन दिवसांत करवसूली आणि वीज देयकापोटी तब्बल १ कोटी ९७ लाख ३८ हजार रुपयाची वसूली झाल्याची माहिती सूत्रांनी शनिवार, १२ नोव्हेंबरला दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजेनंतर अचानकपणे भारतीय चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे ९ नोव्हेंबरच्या सकाळपासूनच नागरिकांची बंद झालेल्या नोटा बँकेत ‘डिपॉझिट’ करण्यासाठी ‘धांदलघाई’ सुरू झाली, ती सलग चौथ्या दिवशी अर्थात शनिवार, १२ नोव्हेंबरलाही कायम असल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान, चलनातून आणि व्यवहारातून रद्द ठरविण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा देवून नागरिक त्यांच्याकडे असलेली नगर पालिका कराची थकबाकी, जलसंपदा विभागाकडून आकारली जाणारी सिंचन पाणीपट्टी, महावितरणची विद्यूत देयके, पंचायत विभागाशी संबंधित गौणखनिज, घरपट्टी, नळ पट्टी, वीज पट्टी आदिंचा भरणा करण्याची मूभा देण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्विकारून त्या-त्या विभागांनी कर भरणा करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे शासनाचे निर्देश आहेत.
तथापि, जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर या चार नगर परिषदा आणि मानोरा, मालेगाव या दोन नगर पंचायतीअंतर्गत ११ नोव्हेंबरला एकाच दिवशी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची करवसूली झाली. त्यात वाशिम नगर परिषदेचा आकडा सर्वाधिक ५३ लाख रुपये आहे. त्यापाठोपाठ रिसोड नगर परिषदेने आतापर्यंत २२ लाख रुपये करवसूली केली असून कारंजा नगर परिषदेने १६ लाख रुपये कर वसूल केला.
मंगरूळपीर नगर पालिका यातुलनेत माघारली असून दोन दिवसांत या पालिकेने ४ लाख रुपयांच्या आसपास कर वसूली केली आहे. मालेगाव नगर पंचायतमध्ये नागरिकांनी दोन दिवसांत १० लाख रुपये कराचा भरणा केला असून मानोरा नगर पंचायतने १ लाख रुपये करवसूली केल्याची माहिती आहे.
बाजार समित्या बंद ठेवू नका - जिल्हा उपनिबंधक
जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच खाजगी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशाप्रकारे बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार बंद ठेवणे योग्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरु करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले. शेतमालास रास्त भाव मिळावा, शेतकºयांना सोयी-सुविधा पुरविणे व त्यांना येणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली आहे. केंद्रशासनाने देशहिताच्या दृष्टीने ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे कारण पुढे करून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी विक्री बंद ठेवणे योग्य नाही. शेतमाल खरेदी विक्रीची रक्कम शेतकºयांना धनादेशाद्वारे अदा करा, असे आवाहन खाडे यांनी केले.