अंगणवाडी केंद्रातील १९ हजार बालकं आधारविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:54 PM2018-08-22T13:54:13+5:302018-08-22T13:55:09+5:30
वाशिम - जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ८८ हजार ६८८ पैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरीत १९ हजार बालकांची आधार नोंदणी बाकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील ८८ हजार ६८८ पैकी ६९ हजार ६२६ बालकांची आधार नोंदणी झाली असून उर्वरीत १९ हजार बालकांची आधार नोंदणी बाकी आहे. या बालकांच्या आधार नोंदणीसाठी ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले असून, अंगणवाडी केंद्रातच पर्यवेक्षिकांद्वारे लवकरच आधार नोंदणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १९ हजार बालकांची आधार नोंदणी अद्याप झाली नाही. आधार नोंदणीअभावी शासनाच्या योजनांपासून कोणतेही बालकं वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर आधार नोंदणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षिकांना मोबाईल टॅब देऊन बालकांची आधार नोंदणी करण्यात येणार आहे. एका पर्यवेक्षिकेकडे साधारणत: २५ ते ३० अंगणवाडी केंद्रांची जबाबदारी असते. जिल्ह्यासाठी तुर्तास ४० मोबाईल टॅब प्राप्त झाले असून, पर्यवेक्षिकांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालकल्याण विभागातर्फे सांगण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिकांना विविष्ट ‘आयडी’ देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी केंद्र स्तरावर बालकांची आधार नोंदणी केली जाणार आहे. तांत्रिक अडचणी उद्भवल्या नाहीत तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास महिला व बालकल्याण विभागाने व्यक्त केला.
जुलै महिन्याचा मुहूर्त हुकला
अंगणवाडी केंद्रात ३१ जुलै २०१८ पूर्वी बालकांची आधार नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या होत्या. तथापि, तांत्रिक कारणांमुळे अद्याप आधार नोंदणी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंगणवाडी केंद्रातच आधार नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, या दृष्टिकोनातून कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने सांगितले.