आणेवारी जास्त असल्याने मंगरुळपीर तालुक्यातील १९ गावे पीकविमा व दुष्काळ सुविधेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:59 PM2018-06-29T13:59:08+5:302018-06-29T14:02:15+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
- नाना देवळे
मंगरुळपीर : तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांची आणेवारी ५० टक्क्यांच्या आत असून उर्वरित १९ गावांची आणेवारी जास्त असल्याने या गावातील शेतकऱ्यांना पीकविमा व ८ प्रकारच्या दुष्काळी सुविधांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
तालुक्यात मागील खरीप हंगामात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात उत्पादनात फटका बसला आहे. शासनाने दुष्काळाची परिस्थिती विचारात घेता ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ उपाययोजना लागू केल्या होत्या. वाशिम जिल्ह्यतील ७७४ गावांमध्ये सन २०१७-१८ मधील अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावांना त्याचा लाभ विविध रूपाने मिळणार आहे. जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे अशा विविध सुविधांचा लाभ या गावांमधील शेतकऱ्यांना होणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील १३८ पैकी ११८ गावांचा यात समावेश आहे. सन २०१७-१८ मधील खरीप हंगामातील आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या गावातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेचा लाभसुद्धा मिळत आहे. मात्र १९ गावांची अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या १९ गावातील लोकांना या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे. अंतिम आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या गावांमध्ये शेलुबाजार, लाठी, चिखली, नांदखेडा, मालशेलु, वनोजा, येडशी, गोगरी, हिरंगी, खेरडा बु, खेरडा खु, चोरद, जनुना खु, शेंदूरजना मोरे, मजलापूर, भुर, पूर, रुई व तांदली या गावाचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना पीक विमा तसेच जिल्ह्यातील ७७४ गावांना मिळणार असलेल्या जमीन महसूल सूट, सहकारी कजार्चे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पाणीपुरवठ्यासाठी टँकर, टंचाईग्रस्त गावात कृषी पंपाची वीज खंडित न करणे या सुविधांचासुद्धा लाभ मिळणार नसल्याचे समजते. जिल्ह्यात सध्या पीक विमा रकमेचे वाटप जोमात सुरू असून पहिल्यांदाच आणेवारी कमी असल्याने शेतकºयांना घसघशीत पीकविमा मिळत आहे. ऐन अडचणीच्या कामात पीक विमा मोबदला कामी येत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. अशातच पीक विमा न काढणारे शेतकरी मात्र या लाभापासून वंचित राहिले आहेत. आता या वंचित शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त आणेवारी असलेल्या १९ गावातील शेतकरी सुद्धा सोबती झाले आहेत. इतर गावातील शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीकडून बऱ्यापैकी विमा मिळत असतांना विमा भरूनसुद्धा विमा मिळण्याची शक्यता आणेवारी जास्त असलेल्या १९ गावांमध्ये नाही त्यामुळे शासकीय आकडेवारीच्या गोंधळात सापडून या गावांमधील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा पिक विमा मोबादल्यापासून वंचित राहावे लागणार असल्याने शासनाने सरसकट तालुक्यातील गावांना ५० टक्क्यांच्या आतील अंतिम आणेवारी लागू करून शेतकºयांना पीक विमा व दुष्काळी सुविधांचा लाभ देण्याची मागणी होत आहे.