धडक सिंचन योजनेतील १९०० विहिरींची कामे अपूर्णच!
By admin | Published: May 4, 2017 01:23 AM2017-05-04T01:23:34+5:302017-05-04T01:23:34+5:30
प्रशासनाची दमछाक : सहस्त्र सिंचनच्या विहिरींची कामेही संथ गतीने
वाशिम : धडक सिंचन योजनेतील विहिरींची कामे जून २०१६ पूर्वीच पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटत आला असताना जिल्ह्याला मिळालेल्या ७ हजार ८०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी ५ हजार ९०० विहिरीच पूर्ण झाल्या असून, १ हजार ९०० विहिरींची कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी बुधवार, ३ मे रोजी दिली.
वाशिम जिल्ह्यात विद्यमान स्थितीत उणेपुरे तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्प कार्यान्वित असून, त्याव्दारेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. मात्र, ते पुरेसे नसून, जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाने धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्याला ७ हजार ८०० विहिरी दिल्या होत्या; परंतु २००६ पासून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. आजही १९०० विहिरींची कामे अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे.
धडक सिंचन विहीर योजनेतील मंजूर विहिरी विविध प्रशासकीय यंत्रणेकडून पूर्ण केल्या जात आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी विहीर पूर्ण झाल्याचा अहवाल मागविला जातो. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे.
- सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम