कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील मंगरूळपीरचे २० जण निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:06 PM2020-05-22T18:06:11+5:302020-05-22T18:06:20+5:30
यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एका अहवालासंदर्भात संभ्रम असल्याने तो परत पाठविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कोरोनाबाधित रुग्णासोबत मंगरूळपीर येथील २१ जणांनी प्रवास केल्याने या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने २० व २१ मे रोजी तपासणीसाठी अकोला पाठविले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एका अहवालासंदर्भात संभ्रम असल्याने तो परत पाठविला जाणार आहे. २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला.
इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलीस यंत्रणेने यश मिळविले होते. अलिकडच्या काळात परराज्यातून येणाºया मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत होती. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित तर एक बालक निगेटिव्ह आले होते. सहा कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका जणाला १९ मे रोजी कोरोनासंसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील २१ जण आले आहेत. या २१ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत एक अहवाल हा पॉझिटिव्हही नाही किंवा निगेटिव्हही नाही. त्यामुळे हा नमुना पुन्हा पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.
आता जिल्ह्यातील अन्य भागातील सात संदिग्ध रुग्णांचे रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून, सदर अहवाल २३ मे रोजी प्राप्त होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला. सात संदिग्ध आणि मंगरूळपीरचा एक संभ्रमित असे एकूण ८ जणांचे अहवाल काय येतात, याकडे आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.