२०० विद्यार्थी अडकले कोटा येथील वसतिगृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:32 PM2020-04-24T15:32:28+5:302020-04-24T15:32:37+5:30
पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थी कोटा येथील विविध वसतिगृहात अडकले आहेत.
- संतोष वानखडे
वाशिम : वैद्यकीय, आयआयटी यासह अन्य परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी अनेक पालक आपल्या पाल्याला राजस्थान राज्यातील कोटा येथे पाठवितात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्याच्या सीमा बंद असल्याने पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थीकोटा येथील विविध वसतिगृहात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यात आणण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा किंवा विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून समोर आली आहे.
कोटा येथे वैद्यकीय, आयआयटी पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी पश्चिम वºहाडातील जवळपास २०० विद्यार्थी गेलेले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन आहे. लॉकडाऊनमुळे पश्चिम वºहाडासह राज्यातून कोटा येथे गेलेले सर्व विद्यार्थी तेथे अडकलेले आहेत. कोटा येथील खासगी शिकवणी वर्ग बंद आहेत, आॅनलाईन क्लासही होत नाहीत. गृहपाठही नाही आणि वसतिगृहाच्या बाहेरही पडता येत नाही. त्यात कोटा शहरात कोरोना रूग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली असून, १५ ते १६ वर्षाच्या या मुलांनाही घराची ओढ लागली आहे. या मुलांसोबतच वसतीगृहात असणारी उत्तर प्रदेशातील मुलांना उत्तर प्रदेश सरकारने शासनाच्या गाड्यांमधून स्वराज्यात नेले आहे. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील राज्यातील या मुलांना स्वराज्यात आणण्यासाठी व्यवस्था करावी किंवा पालकांना परवानगी द्यावी, अशी मागणी पालकांमधून जोर धरत आहे. यासंदर्भात पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही पालकांना औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे २१ एप्रिल रोजी निवेदनही दिले आहे.