जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी २१ जून अंतिम मुदत !
By admin | Published: June 19, 2017 01:15 PM2017-06-19T13:15:57+5:302017-06-19T13:15:57+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच्या बदल्या ‘आॅनलाईन’ पद्धतीने केल्या जाणार आहेत.
वाशिम : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गतच्या बदल्या ह्यआॅनलाईनह्ण पद्धतीने केल्या जाणार आहेत. यासाठी १७ जूनपासून कार्यवाही सुरू झाली असून, २१ जूनपर्यंत शिक्षकांना संबंधित मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला आॅनलाईनची जोड दिली जात आहे. सुरूवातीला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. आता जिल्ह्यांतर्गतची शिक्षकांची बदली प्रक्रियादेखील आॅनलाईन पद्धतीने राबवून, खाबूगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पती-पत्नी एकत्रिकरण, आजारी, दिव्यांग आदी विशेष संवर्गातील शिक्षकांची जिल्ह्यांतर्गतची बदली यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या आॅनलाईन बदली प्रक्रियेला १७ जून पासून राज्यात प्रारंभ झाला असून, २१ जूनपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विशेष संवर्गातील शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. यासंदर्भात संबंधित पोर्टलवर माहिती भरताना शिक्षकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा सूचना शिक्षण विभागाने शिक्षकांना द्याव्या, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिलेले आहेत. पोर्टलवर एकदा माहिती भरून ती अंतिम झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाणार नाही.
जिल्ह्यांतर्गत बदलीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांवर सोपविली होती. सरल प्रणालीवरील नोंदी अद्ययावत झाल्यानंतर आता आॅनलाईन अर्ज पद्धतीला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.