पशूसंवर्धन विभागातील २१ पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:37+5:302021-04-17T04:40:37+5:30
००० धमधमी येथील स्थितीचा आढावा वाशिम : मालेगाव तालुक्यातील धमधमी येथे शुक्रवारी ७३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ...
०००
धमधमी येथील स्थितीचा आढावा
वाशिम : मालेगाव तालुक्यातील धमधमी येथे शुक्रवारी ७३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, धमधमी येथील स्थितीचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी घेतला. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन डाॅ. आहेर यांनी केले.
००
रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडूजीच नाही
वाशिम : किन्हीराजा परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्यांची डागडूजी अद्याप केली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
०००
जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह स्वच्छताही ठेवली जात नाही. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी तेजराव वानखडे यांनी केली.
०००
सर्पमित्रांकडून दोन सापांना जीवदान
वाशिम : गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी विविध ठिकाणी आढळलेल्या दोन सापांना निसर्ग फाऊंडेशनच्या सदस्यांनी सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.
०००
आरक्षण देण्याची मागणी
वाशिम : परीट (धोबी) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याची मागणी धोबी समाज महासंघाने जिल्हा प्रशासनामार्फत राज्य सरकारकडे शुक्रवारी केली.
देशाच्या १७ राज्यांत धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील धोबी समाज हा अनु. जातीत समाविष्ट नाही.
०००
ग्रामसेवकांची ३० पदे रिक्त
वाशिम : जिल्हाभरात ग्रामपातळीवर प्रशासकीय कामकाज सांभाळणाऱ्या ग्रामसेवकांच्या रिक्त पदांमुळे शेतकरी, ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. जिल्हाभरात ३० ग्रामसेवकांची पदे रिक्त असून, ही पदे भरण्याची मागणी होत आहे.
००००
पीक नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा
वाशिम : गेल्या २५ दिवसांपूर्वी शिरपूर परिसरात अवकाळी पावसामुळे भाजीपाला, फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामाही करण्यात आला; परंतु शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळू शकली नाही.
०००
घरकुलांचा शेवटचा हप्ता प्रलंबित
वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल बांधून दीड वर्ष होऊनही शेवटचा हप्ता मिळाला नाही. यासंदर्भात साखळी उपोषण करूनही काहीच फायदा झाला नाही. हा प्रश्न सोडविण्याची मागणी नागिरकांनी केली.
०००
कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित
वाशिम : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कामकाज केलेल्या ९० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालेले नाही. हे मानधन देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
००
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
वाशिम : जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून आठवडी बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी गुरुवारी दिला.
००
मालेगाव येथे नागरिक बिनधास्त
वाशिम : मालेगाव शहरात दिवसेंदिवस काेराेना रुग्णांची संख्या वाढत असताना शहरातील नागरिक मात्र बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
००००
शिरपुरात मधुमक्षिका पेट्यांची प्रतीक्षा
वाशिम : गतवर्षी कोरोना संकट उद्भवण्यापूर्वी बचतगटातील महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळाल्या; मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. मध्यंतरी पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले. असे असताना आता महिलांना मधुमक्षिका पेट्या मिळण्याची प्रतीक्षा लागून आहे.