२२ ग्रा.पं. सदस्य बिनविरोध; ४० पदांसाठी अर्जच नाही
By संतोष वानखडे | Published: October 29, 2023 03:06 PM2023-10-29T15:06:25+5:302023-10-29T15:06:58+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील पोटी व कारंजा तालुक्यातील कामठवाडा अशा दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर ६० ग्रामपंचायतमधील ७६ सदस्यांच्या व चार थेट सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे.
वाशिम : जिल्ह्यात ६० ग्रामपंचायतींच्या रिक्त ७६ सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत असून, २२ सदस्य बिनविरोध तर ४० ठिकाणी उमेदवारी अर्जच दाखल नाहीत. त्यामुळे आता केवळ १४ सदस्य पदासाठी ५ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील पोटी व कारंजा तालुक्यातील कामठवाडा अशा दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक तर ६० ग्रामपंचायतमधील ७६ सदस्यांच्या व चार थेट सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पोटी येथे सरपंच पदासाठी दोन उमेदवारांत थेट लढत असून, कामठवाडा येथे सरपंच पदासाठी तीन उमेदवार नशिब आजमावत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणूक होत असलेल्या ६० ग्रामपंचायतींमध्ये फारशी राजकीय चुरस दिसून येत नाही.
२२ सदस्य पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने या २२ जागा बिनविरोध होण्यातील अडथळा दूर झाला तर २४ ग्रामपंचायतींमधील ४० सदस्य पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नसल्याने या ४० जागा रिक्तच राहणार, यात शंका नाही. सदस्य पदाच्या १४ जागेसाठी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार असून, १४ ठिकाणी कोण विजयी होणार, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.