खरीप पीककर्ज वाटपाचे २२ टक्के उद्दिष्ट अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:45 AM2021-08-28T04:45:44+5:302021-08-28T04:45:44+5:30
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी चालूवर्षी शेतकऱ्यांना १०२५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बाळगले होते. त्यात सर्वाधिक ६०५ कोटींचे उद्दिष्ट ...
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी चालूवर्षी शेतकऱ्यांना १०२५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बाळगले होते. त्यात सर्वाधिक ६०५ कोटींचे उद्दिष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेला देण्यात आले. त्यापाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडियाला ९८ कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला ९५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रला ६८ कोटी, बँक ऑफ इंडियाला २० कोटींचे उद्दिष्ट मिळाले होते. उर्वरित बँकांसाठी हे उद्दिष्ट १० कोटींच्या आतच ठेवण्यात आले. दरम्यान, २६ ऑगस्टअखेर एचडीएफसीने ८ कोटी वाटपापोटी ११२ टक्के; तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ९८.५१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. मध्यवर्ती बँकेला सर्वाधिक उद्दिष्ट मिळूनही ७९.४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले; मात्र उर्वरित बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण तुलनेने कमी असून युको बँकेने आतापर्यंत केवळ ३२.५० टक्के आणि आयडीबीआयने ४२.२१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे, अशी माहिती प्राप्त झाली.
......................
एक नजर प्रमुख बँकांच्या स्थितीवर (आकडे कोटीत)
जिल्हा मध्यवर्ती बँक - ६०५/७९.४३ टक्के
व्हीकेजीबी - ९५/९८.५१ टक्के
एसबीआय - ९८/६२.७८ टक्के
सेंट्रल बँक ऑफ इंडिया - ७०/५९.०७ टक्के
बँक ऑफ महाराष्ट्र - ६८/७९.२६ टक्के
....................
कोट :
यंदाच्या खरीप हंगामात तुलनेने पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अधिक मिळूनही प्रत्यक्ष वाटपाचे प्रमाण अधिक आहे. ज्या बँकांकडून याकामी दुर्लक्ष करण्यात आले, त्यांना गती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत उद्दिष्टपूर्तीसाठी निश्चितपणे अधिक प्रयत्न केले जातील.
- दत्तात्रय निनावकर
व्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम
....................
कोट :
जिल्ह्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीककर्ज मिळण्यापासून वंचित आहेत. त्यात बहुतांश नवीन, तर काही जुने खातेदार शेतकरी आहेत. बँकांचे आडमुठे धोरण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती ओढवली आहे. याप्रकरणी प्रशासनाने पीककर्ज वाटपास दुय्यम स्थान देणाऱ्या बँकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील देण्यात आले आहे.
- विष्णुपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र शेतकरी संघटना