येवती येथील कोल्हापूरी बंधारा दुरूस्तीसाठी २३ लाखाचा निधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 04:32 PM2018-03-17T16:32:05+5:302018-03-17T16:32:05+5:30
वाशिम : येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, दुरूस्तीच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.
वाशिम : येवती येथील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, दुरूस्तीच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. यासंदर्भात आमदार अमित झनक यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता, हे विशेष. ‘लोकमत’नेदेखील वारंवार वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
येवती येथील पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारा असून, सध्या या बंधारा काही ठिकाणी नादुरूस्त आहे. बंधारा दुरूस्त करणे तसेच नवीन गेट टाकून मिळण्याची मागणी युवक काँग्रेसचे रिसोड-मालेगाव विधानसभा अध्यक्ष बाबुराव शिंदे यांनी पाटबंधारे विभाग वाशिमकडे निवेदनाद्वारे केली होती. येवती येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता ९ गेटची आहे. हा कोल्हापुरी बंधारा झाल्यापासुन या क्षेत्रातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. मध्यंतरी या बंधाऱ्याची कोणत्याही प्रकारे देखभाल दुरूस्ती केली नाही तसेच यापुढे देखभाल दुरूस्ती होणार नसल्याचे शेतकऱ्यांना सुरूवातीला सांगितले होते.
तसेच या बंधाराचा समावेश बॅरेजमध्ये करण्याची अफवाही पसरविण्यात आली होती. या प्रकरणात आमदार अमित झनक यांनी लक्ष घालावे, अशी मागणी बाबुराव शिंदे यांनी केली होती तसेच शेतकऱ्यांसह पाटबंधारे विभाग वाशिम येथे ठिय्या दिला होता. याची दखल घेत आमदार झनक यांनी बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाल्या दिल्या होत्या. दुरूस्तीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पाटबंधारे विभागाने दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांच्या निधीची मागणी नोंदविली होती. आमदार झनक यांनी निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. आता शासनाकडून बंधारा दुरूस्तीसाठी २३.३१ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावर्षी बंधाऱ्याची दुरूस्ती होणार असल्याने पुढील रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचन करता येईल, असा विश्वास आमदार अमित झनक, बाबुराव शिंदे यांनी व्यक्त केला.