औषध विक्रेत्यांची २४ तास सेवा; तरीही लसीकरण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 11:28 AM2021-05-24T11:28:45+5:302021-05-24T11:28:51+5:30
Corona Vaccination : कोरोनाकाळात २४ तास सेवा; तरीही लसीकरणात प्राधान्य नसल्याने औषधी विक्रेते, कुटुंबीय व कर्मचाऱ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या काळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात औषध विक्रेत्यांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले असून, केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत औषधी विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोनाकाळात २४ तास सेवा; तरीही लसीकरणात प्राधान्य नसल्याने औषधी विक्रेते, कुटुंबीय व कर्मचाऱ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागून आहे.
संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असून, औषधी विक्रेता व त्यांचे कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. औषधी विक्रेत्यांमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. वाशिम जिल्ह्यात ८०० च्या आसपास मेडीकल स्टोअर्स आहेत. कोरोना रुग्ण, तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळातील ही सेवा लक्षात घेता, कोरोना योद्धे म्हणून सन्मान होणे, औषधी विक्रेते, कुटुंबीय व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, सन्मान तर झाला नाहीच; अद्याप लसीकरणातही प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल औषधी विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.
कोरोनाच्या काळात औषध विक्रेते हे २४ तास सेवा देत आहेत. केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच, परंतु लसीकरणात साधे प्राधान्यही दिले नाही. कोरोना रुग्ण व नातेवाइकांशी जवळून संपर्क येत असल्याने लसीकरणात औषध विक्रेत्यांना प्राधान्य मिळावे, अशी संघटनेची मागणी आहे.
- नंदकिशोर झंवर
विभागीय सचिव, महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन