२४ तास सेवा; तरीही लसीकरण नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:41 AM2021-05-23T04:41:34+5:302021-05-23T04:41:34+5:30
वाशिम : कोरोनाकाळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात मेडिकल संचालकांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या ...
वाशिम : कोरोनाकाळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात मेडिकल संचालकांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले असून केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत औषधी विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे व वशिम जिल्हाध्यक्ष राजेश पाटील सिरसाट, सचिव नंदकीशोर झंवर यांनी दिला आहे.
संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असून औषधी विक्रेता व त्यांचे कर्मचारी स्वत:च्या जिवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. औषधी विक्रेत्यांमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. कोरोना रुग्ण तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत. कोरोनाकाळातील ही सेवा लक्षात घेता औषधी विक्रेत्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप लसीकरणास प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत लसीकरणात प्राधान्य द्यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा औषध विक्रेता संघटनेने दिला.