वाशिम जिल्ह्यातील २४४ बेरोजगारांना मिळाला रोजगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 07:29 PM2017-11-20T19:29:52+5:302017-11-20T19:32:47+5:30
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा पार पडला. यात २४४ उमेदवारांची प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आली.
यावेळी गोटे महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. नारायण गोटे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अ. सं. ठाकरे, प्राचार्य डॉ. जी.एस. कुबडे उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून घेत बेरोजगार युवकांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावावा, असे आवाहन यावेळी अ.सं.ठाकरे यांनी केले.
मेळाव्यामध्ये औरंगाबाद येथील लॉकसेफ मल्टीसव्हीर्सेस प्रा. लि., धूत ट्रान्समिशन, पुणे येथील एस. आय. एस. इंडिया प्रा. लि., नागपूर येथील नवभारत फर्टिलायझर्स प्रा. लि. आणि वाशिम येथील एस.आय.सी. आदी उद्योजक सहभागी झाले होते. यावेळी ७२२ उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती दिल्या. त्यापैकी २४४ उमेदवारांची रोजगारासाठी प्राथमिक निवड करण्यात आली आहे.