वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:28 PM2018-04-05T17:28:39+5:302018-04-05T17:28:39+5:30
वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला.
वाशिम : ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले. यामुळे कधीकाळी परजिल्ह्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ठेवणे शक्य झाले. मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची सुविधा नसल्याने उपलब्ध पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य झाले होते. याप्रकरणी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला. याशिवाय आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला.
वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेती क्षेत्र कोरडवाहू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांवरच अवलंबून आहेत. सिंचनाचा अनुशेषही मोठ्या प्रमाणात असल्याने फळपिके, भाजीपाला यासह बागायती क्षेत्राचे प्रमाण नगण्य आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. मात्र, त्यातील पाणी वापरण्याकरिता लागणारी वीज उपलब्ध नव्हती. मध्यंतरी महावितरणने बॅरेजेस परिसरातील वीज सुविधा उभारण्याकरिता ९२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र, निधी नेमका कुणी द्यायचा, यावर एकमत होत नव्हती. आमदार राजेंद्र पाटणी यांनी याकामी पुढाकार घेवून जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघला असून ५ एप्रिल रोजी आमदार पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मांदळे, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया, कार्यकारी अभियंता तायडे यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.