गजानन महाराज संस्थानकडून अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:17 PM2018-02-10T15:17:23+5:302018-02-10T15:24:26+5:30
वाशिम: वारकऱ्यांच्या वारसांना गजानन महाराज संस्थानच्यावतीने प्रत्येकी २.५० लाख रुपये प्रमाणे एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आली आहे.
वाशिम: तालुक्यातील उमरा कापसे येथून शेगावला प्रकटदिनानिमित्त निघालेल्या वारीतील वाहनाचा अपघात घडून चार वारकऱ्यांचा ५ फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. या वारकऱ्यांच्या वारसांना गजानन महाराज संस्थानच्यावतीने प्रत्येकी २.५० लाख रुपये प्रमाणे एकूण १० लाख रुपयांची आर्थिक मदत सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात आली आहे. या मदतीचे मागणी धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) वारसांच्या नावे देण्यात आले आहेत.
उमरा कापसे येथून गेल्या २५ वर्षांपासून संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त पायदळ दिंडी काढण्यात येते. यंदाही येथून ही दिंडी काढण्यात आली होती. ही दिंडी अकोला जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असताना बाळापूर-पातूर मार्गावरील बाघ फाट्यानजिक या दिंडीतील वाहनाला सरकी नेणाºया ट्रकची धडक लागल्याने विसावा घेत असलेल्या चार वारकºयांचा अपघातात मृत्यू झाला. उमरा कापसे येथील काशिनाथ चंद्रभान कापसे, लिलाबाई बळीराम कापसे आणि रमेश धनाजी कापसे यांचा आणि उमरा कापसे येथून जवळच असलेल्या जवळा येथील रामजी नामदेव काकडे यांचा मृतकांमध्ये समावेश होता. या दुर्दैवी घटनेची दखल संत गजानन महाराज संस्थान शेगावकडून घेण्यात आली आणि या चारही वारकºयांच्या वारसांना प्रत्येकी २.५० लाख रुपये सानुग्रह अनुदान म्हणून आर्थिक मदत देण्यात आली. सदर सानुग्रह अनुदान हे धनाकर्षाच्या रुपात वारसांच्या नावे देण्यात आले आहे. हे धनाकर्ष सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा शेगावच्या नावे असून, ९ फेब्रुवारीला हे धनाकर्ष तयार केले आहेत.