अवकाळीने नाल्यातील गाळात फसून २५ मेंढ्या दगावल्या

By नंदकिशोर नारे | Published: November 30, 2023 04:33 PM2023-11-30T16:33:50+5:302023-11-30T16:34:08+5:30

जामणी शिवारातील घटना, मेंढपाळांना दीड लाखाचा आर्थिक फटका

25 sheep got trapped in the silt of the drain due to storm | अवकाळीने नाल्यातील गाळात फसून २५ मेंढ्या दगावल्या

अवकाळीने नाल्यातील गाळात फसून २५ मेंढ्या दगावल्या

वाशिम  : कारंजा तालुक्यातील इंझोरी नजिक उजाड जामणी शेतशिवारात सोमवार आणि मंगळवारी जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे नाल्याला काठोकाठ पाणी आल्याने काठालगत झालेल्या गाळात २५ मेंढ्या फसल्या. त्यानंतर पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे त्या दगावल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली असून मेंढपाळांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

बबन संतू कोळकर, रा. नवसाळा, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला व विजय निंबाजी कोळकर, रा. शिवनगर, ता. कारंजा, जि. वाशिम हे दोन मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांना चारण्यासाठी उजाड जामणी शेतशिवारात मागील पंधरा दिवसांपासून मुक्कामी होते. अशातच सोमवार व मंगळवारी अचानक या शिवारात जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे या शिवारात असलेला मोठा नाला काठोकाठ भरून वाहू लागला आणि नाल्याच्या काठावर दल दलसदृश गाळ तयार झाला. या गाळात फसल्याने बबन कोळकर यांच्या १४, तर विजय कोळकर यांच्या ११ मेंढ्या फसल्या. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी दुसऱ्या दिवशीही जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे या २५ मेंढ्या दगावल्या. या दोन्ही मेंढपाळांचे मिळून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.

तलाठ्यांनी केला पंचनामा
उजाड जामणी शिवारात अवकाळी पावसामुळे नाल्याच्या गाळात फसून २५ मेंढ्या दगावल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तलाठ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. या नुकसानापोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी मेंढपाळांनी केली आहे.

Web Title: 25 sheep got trapped in the silt of the drain due to storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.