औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; सुदैवाने जिवित हानी टळली
By दादाराव गायकवाड | Published: September 8, 2022 06:43 PM2022-09-08T18:43:42+5:302022-09-08T18:44:43+5:30
औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रकला आग लागल्यामुळे २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे.
जऊळका (वाशिम) : सोयाबीनची वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकला आग लागल्याने २५० क्विंटल सोयाबीनसह ट्रक जळून खाक झाला आहे. त्यामुळे १५ लाखांचे नुकसान झाले. ही घटना औरंगाबाद-नागपूर महामार्गावरी वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली.
औरंगाबाद- नागपूर महामार्गावर जऊळका नजिक ७ ऑगस्टच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान ट्रक क्रमांक एमएच ४०, बीएल ९३९२ क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन नागपूर येथून औरंगाबादकडे जात होता. हा ट्रक मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वेनजिक पोहोचला असता ट्रकच्या वायरिंगमध्ये शॉटसर्किट होऊन ट्रकला अचानक आग लागली.
दरम्यान, आगीत २५० क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. हा ट्रक बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील शे. राजिक शे.रज्जाक रा.लोणार जी. बुलढाणा यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, अग्नीशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी जऊळका पोलिसांनी सुरळीत केली.